जेएनएन, मुंबई. राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आता मुंबईतही मागील काही दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे. आजही हवामान विभागाने मुंबईत रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे.

अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर पडू नका

सध्या मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट देण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. कृपया अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर पडू नका. प्रवास करावा लागल्यास काळजीपूर्वक नियोजन करूनच बाहेर पडा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी

आमचे अधिकारी आणि कर्मचारी मदतीसाठी तत्पर आहेत. आपत्कालीन प्रसंगी 100/ 112 / 103 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. आपली सुरक्षितता आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे, असं पोलिसांनी आपल्या X वर म्हटलं आहे.

पुढील तीन ते चार तासांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा

    भारतीय हवामान खात्याने आज सकाळी 10 वाजता दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरात पुढील तीन ते चार तासांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की योग्य ती काळजी घ्यावी. आवश्यकता नसेल तर कृपया घराबाहेर पडणे टाळावे, असं आवाहन हे बीएमसीनेही केले आहे.

    मदतीसाठी इथं करा कॉल

    आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षातील 1916 या मदत सेवा क्रमांकावर कृपया संपर्क साधावा, असं बीएमसीने म्हटलं आहे.

    कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट

    • रेड - ठाणे, मुंबई, रायगड, रत्तागिरी, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा घाट, 
    • ऑरेंज - सिंधुदुर्ग, पालघर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, अमरावती, 
    • येलो - धुळे, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाट, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशीव, अकोला,  भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

    हेही वाचा - Weather Update : 4 दिवसापासून कोकणात जोरदार पाऊस सुरूच ! पाहा राज्यात पुढील 24 तासांसाठी कोठे-कोठे रेड अलर्ट